Friday, June 11, 2010

माझे आकलन :

माझ्या माफक बुद्धीला मर्ढेकरांची कविता जशी कळली - किंवा कदाचित कळली नाही - त्याचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न ! ह्या शोधातली प्रत्येक वाट - ही बरोबर असेलच याची शाश्वती देण्याइतकी माझी बौद्धिक ऐपत आहे असा मला मुळीच वाटत नाही ! त्यामुळे माझी Interpretations कदाचित पूर्णपणे चुकीची असू शकतात. कदाचित कालानुरूप , अनुभवानुरूप, अभ्यासानुरूप आणि या सर्वांमधून येणाऱ्या समजेनुरूप ती बदलू शकतील ! त्यामुळे कुठे चुकलो तर कृपया मर्ढेकरांच्या कवितांचा प्रचंड अभ्यास असणाऱ्या ज्येष्ठ अभ्यासकांनी योग्य रस्ता दाखवावा - ही कळकळीची , शुद्ध विनंती !

मर्ढेकरांची कविता ह्या पुस्तकात त्यांच्या १२८ कविता आहेत. त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे :

१) शिशिरागम
२) कांही कविता
३) आणखी काही कविता
४) असंगृहीत

मला स्वतःला कांही कविता , आणखी काही कविता आणि असंगृहीत हे ३ संग्रह शिशिरागम पेक्ष्या जास्त आवडले. वाचनात येणाऱ्या कविता - पुस्तकातल्या कवितांच्या किंवा संग्रहाच्या क्रमानुसार नाहीत ! म्हणून प्रत्येक कवितेखाली तिच्या संग्रहाचे नाव मुद्दामून लिहिलेले दिसेल.

धन्यवाद !

माझा अभंग माझी ओवी ! नतद्रष्ट गाथा गोवी ,
इंजीनावीण गाडी जेंवी ! घरंगळे !!

कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ ! कुठे तुकाराम पवित्र,
कुठे समर्थ धीरोद्दात्त ! संत सर्व !!

संत शब्दांचे नायक ! संत अर्थांचे धुरंदर;
एक शब्दांचा किंकर ! डफ्फर मी !!

ज्ञान-विज्ञानी उमाळा ! सत्ता मारी तिरपा डोळा ,
सोन्याचांदीचा सोहळा ! आततायी !!

ऐशा टापुंत चौफेर ! नाही माहेर-सासर ;
कैंचे गोत्र व प्रवर ! अनामिका !!

नेणें बिजली वा पणती ! स्थिर आहे तरी दृष्टी ;
आपद्धर्मे नाही कष्टी ! बावळा मी !

परी फाटे हे अंतर ! आणि जन्मा येई अंबर !
तोडा नाळ-अवडंबर ! नारायणा !!

अहो शब्दाराजे, ऐका ! लाज सेवकाची राखा ;
नाही तरी वरती काखा ! आहेत ह्या !!

संग्रह : काही कविता !


माझे आकलन :

दर्जेदार आणि जातिवंत साहित्याच्या, स्वतःच्या 'सततच्या' नव-निर्मिती क्षमतेबाबतची मर्ढेकरांची साशंकता मला वरील ओव्यांमधून जाणवते. पण त्याच वेळी दुसर्या बाजूला मला हे अभ्यासू आणि काव्याच्या दर्जाबाबतची सखोल जाण असणाऱ्या वृत्तीचं लक्षण वाटतं. पण कदाचित - यात ' आधीच आपली क्षुद्रता मान्य केली की बरं असतं ' अशी मानसिकताही असू शकते ! कारण पहिल्याच कडव्यात ते म्हणतात :

माझा अभंग माझी ओवी ! नतद्रष्ट गाथा गोवी ,
इंजीनावीण गाडी जेंवी ! घरंगळे !!

मला इथे प्रश्न असा पडतो - की जर मर्ढेकरांना त्यांच्या कुवतीची एवढी सखोल जाण होती - तर त्यांनी पुढची साहित्यनिर्मिती केलीच का ? इंजिन नसलेल्या गाडीसारखी माझी - आणि माझ्या काव्याची अवस्था आहे - तर मग मी ती चालवायचीच का ? इथे स्वतःच्या काव्यक्षमतेबाबत मर्ढेकरांना नसलेला आत्मविश्वास मला तरी जाणवतो. पण तो का ? याचाही विचार करणे गरजेचे आहे - कारण इथे मर्ढेकर comparison संतांबरोबर - करत आहेत ! कदाचित त्यांच्या मते - ते स्वतःला संतांच्या पातळीवर पाहू शकत नसतील ! मी आधी म्हणल्याप्रमाणे हे काव्याच्या दर्जाबाबतची सखोल जाण असणाऱ्या वृत्तीचं लक्षण वाटतं. संतांनी साऱ्या समाजासाठी मागणं मागितलं - एवढी त्यागी वृत्ती आणि दानत - माझी नाही - हा विचारही कदाचित त्यामागे असेल. त्या अर्थानेच कदाचित 'डफ्फर' हा शब्द आला असेल. कदाचित - 'मी प्रतिभेच्या जोरावर साऱ्या समाजासाठी मागणं मागितलं तरी त्यातल्या संदर्भांशी आणि वृत्तीशी ईमान राखणं मला जमलं नाही तर तसलं काहीतरी खरडण्यात तरी काय अर्थ आहे ' - हा आंतरिक 'स्व-खुलासा' देखील ह्यात अदृश्य स्वरुपात असू शकतो !

पुढच्या ओळींमध्ये मर्ढेकरांच्या मानसिक अवस्थेचं आणि आजूबाजूच्या परिस्थितीचं प्रांजळ वर्णन येतं.

ज्ञान-विज्ञानी उमाळा ! सत्ता मारी तिरपा डोळा ,
सोन्याचांदीचा सोहळा ! आततायी !!

ऐशा टापुंत चौफेर ! नाही माहेर-सासर ;
कैंचे गोत्र व प्रवर ! अनामिका !!

" मला ज्ञान-विज्ञानाचं' भान आहे. त्याच वेळी सत्तेची ( कोणत्या स्वरूपातल्या ते कळत नाही ) आमिष माझ्या भोवती नाचत आहेत. अशाप्रकारच्या परिस्थितीत " नाही माहेर-सासर " - मी स्वतःला कुठेच identify करू शकत नाहीये. अशा अनामिकतेला कसला आलाय आगा-पिच्छा. माझ्या मते मला इथे - " माझ्या प्रतिभेवर कोणाचा शिक्का नाही - किंवा प्रभाव नाही " असा मर्ढेकरांना वाटत असावं असं वाटतं. 'गोत्र आणि प्रवर' हे शब्द त्या अर्थी आले असावेत.

पुढे ते म्हणतात :

नेणें बिजली वा पणती ! स्थिर आहे तरी दृष्टी ;
आपद्धर्मे नाही कष्टी ! बावळा मी !

' अश्या मीच निवडलेल्या परिस्थितीवर किंवा वाटेवर जरी प्रकाशमान काही नसलं तरी माझी दृष्टी स्थिर आहे आणि या सगळ्या माझ्या अवस्थेवर मी दुख्खी नाही - मग मी 'बावळा' का असेना ! ' - हा माफक विश्वास किंवा सेल्फ confidence कुठून आला ? ह्याला स्वतःच्या एकूणातल्या क्षमतेविषयीची प्रांजळ कबुली म्हणावी की ' जरी मी तुमच्या एवढा उदात्त - उन्नत नसलो तरी माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या तूलनेत मी बराच सरस आहे ' - हा स्व-अस्तित्व अधोरेखनाचा प्रयत्न म्हणावा - मर्ढेकरच जाणोत !

पण काहीही असलं तरी मर्ढेकर शेवटी कोणत्या तरी शक्तीला शरण जातात असं शेवटच्या २ कडव्यान्मधून जाणवतं.

परी फाटे हे अंतर ! आणि जन्मा येई अंबर !
तोडा नाळ-अवडंबर ! नारायणा !!

इथे - कोणत्या तरी अचाट - उकल न होणाऱ्या प्रश्नांपुढे किंवा स्व-क्षमतेच्या after -effect मधून जन्माला आलेल्या व स्वतःला असलेल्या प्रचंड अज्ञानाच्या जाणिवेतून छाती दडपली जाण्याचा feel मला जाणवतो.

तोडा नाळ-अवडंबर ! नारायणा !! - हे कोणत्या प्रकारच्या नाळे संबंधी आहे हे मात्र माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडच आहे. पण विचार केल्यावर असं वाटतं - की ही नाळ - ' विनाकारण माझ्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या असंख्य खोट्या अस्तित्वांशी निगडीत आहे '.

शेवटची ओळ मात्र गमतीदार आहे. मर्ढेकर म्हणतात :

अहो शब्दाराजे, ऐका ! लाज सेवकाची राखा ;
नाही तरी वरती काखा ! आहेत ह्या !!

" माझी विनंती आहे - शब्दाराजे तुम्हाला की माझी please लाज राखा, मला सांभाळून घ्या , मला कुठेही घसरण्यापासून वाचवा ! आणि अगदी माझ्या दुर्दैवाने समजा तुम्ही मदतीला धावून आला नाहीतच - तर काय ? मी तर आधीपासूनच ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पासून स्वतःला दूर केलंय - पहिल्या कडव्यांमध्ये मी maza ( हल्लीच्या सिरियल्स किंवा सिनेमांमध्ये सुरुवातीला येतो तसा ) Disclaimer नमूद करून या सगळ्यापासून स्वतःला वरील कबुली जबाबाच्या माध्यमातून technically वाचवलेलं आहेच्चे ! "